राजकीय
Trending

प्रशासनातील दीपस्तंभ : प्रभाकर देशमुख साहेब

लेखन प्रकार – स्तंभलेख

लेखक – प्रा.संजय जगदाळे

NET,SET,MBA,MAJMC, MA,GDCA.

दहिवडी कॉलेज दहिवडी ९०२२२००३२०


        सार्वजनिक सेवा म्हणजे केवळ अधिकारांचे पद धारण करणे नव्हे; ती समाजकल्याणासाठीची एक साधना आहे. या साधनेचा अर्थ आपल्या कृतीतून साकार करणारे अधिकारी अत्यंत दुर्मिळ असतात. अशा कर्तव्यशील अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे माननीय प्रभाकर कृष्णाजी देशमुख- माण तालुक्यातील दुष्काळी मातीतून उभा राहिलेला आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाला मानवतेचा नवा चेहरा देणारा अधिकारी.


संघर्षातून निर्माण झालेली प्रेरणा



    २६ जानेवारी १९५७ रोजी सातारा जिल्ह्यातील लोधवडे या छोट्या, पण संघर्षमय गावात प्रभाकर देशमुख यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मल्याने मातीशी आणि तिच्या समस्या यांच्याशी त्यांचे नाते जन्मजातच जोडले गेले. प्रारंभीच्या प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाचा ध्यास घेत त्यांनी पुणे कृषी महाविद्यालयातून कृषीशास्त्र विषयात एमएससी प्रथम श्रेणीने पूर्ण करून रौप्य पदक मिळवले. याच ज्ञानाच्या बळावर त्यांनी १९८२ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेचा प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, कृषी आयुक्त, विभागीय आयुक्त,जलसंधारण सचिव अशी अनेक जबाबदारीची पदे यशस्वीपणे भूषविली. श्री देशमुख यांच्या कारकिर्दीची वैशिष्ट्य म्हणजे प्रशासनातील मानवतावादी दृष्टिकोन. त्यांनी केवळ कर्तव्यपूर्ती न करता लोककल्याणाला केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेतले.म्हणूनच ते एक लोकाभिमुख प्रशासक म्हणून राज्यभर परिचित झाले.पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी म्हणून काम करताना बडवे, उत्पात या मंडळींकडून मंदिर समितीचा ताबा घेतला. या विरोधात हायकोर्टात अनेक खटले उभे राहिले. मंदिर समितीत अनेक सुधारणा घडवून आणल्या. तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते दर्शन मंडपाचे उद्घाटन करून दर्शन मंडप बांधण्यासाठी अनेक लोकांचा विरोध सहन केला. मात्र ज्येष्ठ निरूपणकार डोंगरे महाराज यांच्या सहकार्याने दर्शन मंडपाचा प्रश्न मार्गी लावला.


शिक्षण क्षेत्रातील संवेदनशील योगदान


      कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी राबवलेला “राजर्षी शाहू सर्वांगीण शिक्षण कार्यक्रम” हा ग्रामीण शिक्षणात परिवर्तन घडवणारा ठरला. शाळांची गुणवत्ता,शिक्षकांचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या सर्व पैलूंवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.या अभिनव उपक्रमामुळे प्राथमिक शिक्षणाच्या दर्जात लक्षणीय सुधारणा झाली आणि याच कार्यासाठी त्यांना २००८ मध्ये प्रतिष्ठित पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय,रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य म्हणून त्यांनी ग्रामीण आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही मोलाचे योगदान दिले.शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे,ही त्यांची धारणा होती आणि ती त्यांनी कृतीत उतरवली.त्यांच्याच मार्गदर्शनाखाली २०२३ साली दुष्काळी भागातील दहिवडी महाविद्यालयाला A++ नॅक मानांकन मिळाले, यातून त्यांनी त्यांची ग्रामीण शिक्षणाबद्दलची तळमळ दिसून येते.



कृषी व जलसंधारण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण दृष्टिकोन


     शेतकऱ्यांच्या वेदना आणि मातीची ओढ यांची जाण असल्याने देशमुख यांनी कृषी क्षेत्रात अनेक परिवर्तनकारी निर्णय घेतले. कृषी आयुक्त म्हणून त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला कडधान्य उत्पादनासाठी कृषी कर्मण पुरस्कार मिळाला. सोयाबीनवरील कीड संकटाच्या काळात त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. या नावीन्यपूर्ण कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.परंतु त्यांच्या कार्याचा सुवर्ण अध्याय म्हणजे “जलयुक्त शिवार अभियान.” जलसंधारण सचिव म्हणून त्यांनी ही राज्यव्यापी योजना साकारली.“गावचं पाणी गावातच अडवा” या सोप्या, पण परिणामकारक सूत्रावर आधारित या योजनेने हजारो गावे टँकरमुक्त केली. माण-खटाव परिसरातील जलसंधारणाची कामे आजही त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण म्हणून गौरविली जातात.


निवृत्तीनंतरही जनसेवेची धडपड


     २०१७ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर साहेबांनी निवांत जीवनाचा मार्ग न निवडता समाजकार्याचा पर्याय निवडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून त्यांनी धोरणात्मक पातळीवर जनतेसाठी कार्य सुरू केले. २०२१ मध्ये त्यांची महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. कोरोना संकटाच्या काळात त्यांच्या निर्णयक्षमतेचा आणि अनुभवी नेतृत्वाचा राज्याला मोठा लाभ झाला.


एक प्रेरणादायी दीपस्तंभ


संत तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग प्रभाकर देशमुख यांच्या कार्याला अचूकपणे लागू होतो.


जे का रंजले गांजले ।
त्यासि म्हणे जो आपुलें ॥

तो चि साधु ओळखावा ।
देव तेथें चि जाणावा ॥

प्रभाकर देशमुख यांचे कार्य तुकाराम महाराजांच्या तत्त्वज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. या अभंगानुसार, जो व्यक्ती पीडित आणि दुःखी लोकांना आपले मानतो, तोच खरा साधू असतो. देशमुख साहेब यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीत हेच तत्त्वज्ञान जगले. माण तालुक्याच्या दुष्काळी मातीतून आल्याने त्यांनी शेतकरी, गरीब आणि वंचित घटकांच्या वेदनांना नेहमीच आपले मानून त्यांचे निराकरण करण्याचाच तत्पर प्रयत्न केला. “जलयुक्त शिवार अभियानाद्वारे हजारो गावे टँकरमुक्त करून त्यांनी पीडितांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारे, देशमुख यांनी सार्वजनिक सेवेला केवळ अधिकारपद न मानता ती एक “कठोर साधना” म्हणून स्वीकारले आणि आपल्या कार्यातून प्रशासनाला मानवतेचा चेहरा दिला.


 

चैतन्य नंदकुमार काशिद

लोकसेवा टाइम्स you tube आणि web portal हे "प्रबोधन,जनजागृती, क्रांती आणि विकास हाचं लोकसेवेचा ध्यास !" या चॅनेलच्या ब्रीदवाक्याला आदर्श मानून काम करते. यामध्ये आपण नैतिकता,नीतिमत्ता,सत्य,तत्व,सदाचार, मानव धर्म या मानवी मूल्यांचे जतन,संवर्धन आणि संरक्षण करून मा.भारतीय संविधान सर्वोच्च मानून संविधानिक मार्गाने सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,धार्मिक,औद्योगिक,कला,क्रीडा,कृषी,साहित्य,मनोरंजन आणि बऱ्याच काही विषयांवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बातम्या,मुलाखती,अचूक विश्लेषण समजून घेण्यासाठी चॅनेलला Subscribe करा. आपल्यालाही,आमच्यासोबत या विषयांवर काम करायचे असेल,बातम्या लावायच्या असतील तर आपणही आपल्या लोकसेवा टाइम्स या चॅनेलचा एक घटक होऊ शकता,या चैनल वर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची इच्छा असेल तर तशी संधी देण्याचा अवश्य प्रयत्न करण्यात येईल. https://youtube.com/@Loksevatimes?si=CcTmEGkDXdbMYjCB आपल्याला ही विचारधारा योग्य वाटल्यास लोकसेवा टाइम्स या चॅनलला Subscribe करा,Like करा आणि Share करा. लोकसेवा टाइम्स संपादक - चैतन्य नंदकुमार काशिद मो.नं. - ९८८१८०८५३३

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या पोर्टल वरील कोणताही मजकुर,फोटो कॉपी करू नये.