वृत्त दि.- २६ फेब्रुवारी २०२५
वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी देव, देश व धर्मासाठी केलेल्या बलिदानाची जाणीव हिंदू समाजास व्हावी म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने २८ फेब्रुवारी ते २९ मार्चपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदानमास पाळण्यात येतो. गेली ३९ वर्षे हा बलिदानमास पाळला जातो.
या पार्श्वभूमीला अनुसरून, सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरांमध्ये शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी बलिदान मासाची सुरुवात होऊन ते शनिवार दि.२९ मार्च रोजी बलिदान मासाची सांगता होत आहे.दहिवडी येथील छ.शिवाजी महाराज चौकात दररोज संध्याकाळी सात वाजता छ. संभाजी महाराज यांना श्लोक म्हणून, प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्र घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
बलिदान मासानिमित्त दहिवडी येथील सुमारे एकशे पन्नास तरुणांनी मुंडण केले आहे. सुमारे एक महिना सर्व तरुणांनी एक वेळेचा उपवास केला आहे. काही तरुणांनी चप्पल न घालण्याचा संकल्प केला आहे.

माण तालुक्यातील दहिवडी, बिदाल, गोंदवले बुद्रुक, म्हसवड, वडजल, मलवडी या सह अनेक गावांत बलिदान मास पाळण्यात येत आहे.
हिंदवी स्वराज्यासाठी प्रचंड झुंज देणारे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेब याने पकडले. त्यांचा पाशवी छळ करून त्यांचा रोज एक-एक अवयव संपूर्ण महिनाभर तोडत होते. अंगाची साल सोलून काढत होते. शेवटी फाल्गुन अमावस्येचे दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे शस्त्राच्या साह्याने तुकडे तुकडे केले गेले. म्हणजेच श्रीसंभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने,बलिदानाच्या मार्गावर,संपूर्ण महिनाभर, रोजच अति धीरोदात्तपणे, चालत होते. म्हणून त्यांना फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्रद्धांजली वाहून, “धर्मवीर बलिदान मास” पाळला जातो.

दहिवडी शहरात दररोज सायंकाळी तरुण, शालेय मुले, नागरिक छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या ठिकाणी जमतात. शहरात दररोज प्रतिष्ठानचे धारकरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर दररोज नतमस्तक होतात… पूजन करतात… फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच, सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर धर्मवीर बलिदान मास हा पाळला जातो.
या संपूर्ण काळात; एकवेळचे जेवण करणे, मिष्टान्न न खाणे, चहा, पान-तंबाखू सेवन न करणे, टीव्ही अथवा चित्रपट न पाहणे, पायात पादत्राणे न घालणे हे सर्व किंवा यामधील एक गोष्ट सोडणे. हा सुतकाचा महिना असल्याने आनंदाच्या, उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे. नविन खरेदी न करणे, लग्नसमारंभ व शुभप्रसंग आयोजित न करणे रोज छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांची प्रतिमा लावून, त्यास रोज पुष्प अर्पण करून, त्यासमोर प्रेरणामंत्र, ध्येय मंत्र आदी म्हणून, श्री संभाजीसूर्यहृदय म्हणून रोज श्रद्धांजली वाहिली जाते. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण करुन मुकपदयात्रेचे आयोजन केले जाते.
मुकपदयात्रा म्हणजे धर्मवीर छत्रपती श्रीसंभाजी महाराज यांना औरंग्याने क्रूरपणे हाल हाल करून प्रतिदिवस एक एक अवयव तोडत एक महिनाभर छळ करत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन अमावस्येला मारून टाकले, त्यांचे तुकडे भिमा इंद्रायणी नदीच्या संगमात टाकुन दिले.

हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीची हि अवस्था केली गेली यात धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या शरिराला निटसा मंत्राग्नी ही दिला गेला नाही आणि त्यांची अंत्ययात्राही काढली गेली नाही म्हणुन त्यांच्या या दिव्य व ज्वलज्वलनतेजस बलिदान स्मरुण त्यांची कधी न निघालेली अंत्ययात्रा काढणे म्हणजेच “ मुकपदयात्रा”

येणाऱ्या फाल्गुन अमावस्येला म्हणजेच आंग्ल दिनांक २९ मार्च २०२५ वार शनिवार रोजी सायंकाळी ठिक ६:३० वा दहिवडी शहरात मुकपदयात्रेच आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान माण तालुक्याच्या वतीने करण्यात आलेले आहे. ह्या मुकपदयात्रेची सुरुवात हि छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातून होऊन पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – बाजार पटांगण – चावडी चौक – सुतार गल्ली – श्री गणेश मंदिर - आद्यक्रांतिवीर उमाजी राजे नाईक चौक – बाजार पटांगण मार्गे – छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे येऊन ध्येयमंत्र व श्री संभाजीसुर्यह्यदयजाळाचे पठण करुन समारोप होणार आहे. तरी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना श्रध्दांजली वाहण्यासाठी दहिवडी व दहिवडी पंचक्रोशीसह माण तालुक्यातील तमाम शिवप्रेमींनी, हिंदू धर्म बांधवांनी तसेच सुजान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान माण तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.