आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामसभाजिल्हाताज्या घडामोडीप्रशासकीयमहाराष्ट्रविशेषसामाजिक
श्री सिद्धनाथ यात्रा दहिवडी उत्साहात साजरी ! दि.२६ ते २८ एप्रिल सलग तीन दिवस झाले विविध कार्यक्रम…
वृत्त दि. – १ मे २०२५
वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा.
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहराचे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी या देवांची यात्रा रविवार दि.२६ ते सोमवार दि.२८ एप्रिल २०२५ यादरम्यान धार्मिक तसेच करमणूक आणि बैलगाडा शर्यती,कुस्ती स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे.
श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त शनिवार दि.२६ एप्रिल रोजी आयोजित बैलगाडी शर्यतीत जहाँगीर व इरफान मुलाणी (नातेपुते) आणि शाहरुख मुलाणी (कुळकजाई) यांच्या मल्हार – राजा या बैलांच्या जोडीने बाजी मारत विजेतेपद पटकावले.
या बैलगाडा शर्यतीला उत्स्फूर्तप्रतिसाद मिळाला. या शर्यतीतील अनुक्रमे, दुसरा ते सातवा क्रमांक पुढीलप्रमाणे सार्थक कृष्ण सावंत व गणपत असद यांचा पक्ष्या व हरण्या, मनस्वी सुशांत पवार (मार्डी) यांचे शंभू व मन्या, रिया जयेश पाटील (सोनारपाडा) यांचे नंद्या व सुंदर, (कै.) आशिष (बबलू) पवार मित्र परिवार दहिवडी यांचे लक्ष्या व रामू, ज्योतिलिंग प्रसन्न सुमित (मुंबई) यांचे लखन बुलेट आणि नवनाथ शिरकुळे सोकासन.
या शर्यतीतील प्रथम सात विजेत्यांना अनुक्रमे ५१ हजार,३१ हजार,२१ हजार,११ हजार, सात हजार, सहा हजार व पाच हजार रुपये अशी रोख बक्षिसे आणि मानाची ढाल देण्यात आली. या शर्यतीचे नेटके नियोजन नगरपंचायत तसेच महेश जाधव व राजू मुळीक मित्र परिवार यांनी केले.
रविवार दि.२७ एप्रिल रोजी श्री सिद्धनाथ यात्रेचा मुख्य दिवस होता श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी यांचा धार्मिक परंपरेनुसार विवाह सोहळा होऊन आरती झाल्यानंतर सकाळी १० -१५ या वेळेत देवांच्या मुख्य मूर्ती रथात बसवून व श्री सिद्धनाथाच्या नावाने चांगभलं… या गजरात, गुलाल खोबऱ्याची उधळण करत भाविक मोठ्या भक्ती भावनेने श्रींचा रथ ओरडत होते. रथ आओढण्यासाठी महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

गुलाल खोबऱ्याची उधळण करत रथावर नोटांच्या माळा,नारळाची तोरणे अर्पण करत होते.रथ मार्गावर भाविकांनी रांगोळ्या काढल्या होत्या.रथोत्सवादरम्यान तीन बत्ती चौकापासून भाविकांसाठी पाणी,लस्सी आणि अल्पोहाराचे मोफत वाटप सुरू झाले आणि पुढे शहरातील काही गणेश मंडळांमार्फत याचे वाटप करण्यात आले.






