आरोग्य व शिक्षणजिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशप्रशासकीयमहाराष्ट्रराजकीयविशेषसामाजिक
Trending
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माण – खटाव मतदार संघात झाला रक्तदान महायज्ञ !
वृत्त दि.- मंगळवार,२२ जुलै २०२५
वृत्त – दहिवडी, ता.माण,जि.सातारा.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवार दि.२२ जुलै रोजी वाढदिवस असतो.त्यानिमित्त सातारा जिल्ह्यासह माण- खटाव भाजपच्या वतीने ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी,म्हसवड व वडूज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तसेच दहिवडी येथे मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगराध्यक्षा सौ.नीलम अतुल जाधव यांच्या संकल्पनेतून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी,पोस्टरबाजी करू नका अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्याऐवजी समाजसेवेचे उपक्रम राबवण्याचे आवाहन प्रदेश भाजपने केले.संपूर्ण देशभरासह जिल्ह्यातही रक्ताचा तुटवडा आहे.अनेक रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात अडचणी येत आहेत.त्यामुळे सामाजिक संवेदनशीलता दाखवत रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
याच उपक्रमाचा भाग म्हणून मंगळवार दि.२२ जुलै रोजी माण – खटाव मतदारसंघांमध्ये दहिवडी येथे नगरपंचायत कार्यालयासमोर,वडूज येथे पंचायत समिती सभागृह खटाव (वडूज) तर म्हसवड नगरपरिषद कार्यालयासमोर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५-३० या वेळेत भव्य रक्तदान शिबिर झाले.या शिबिराचे उद्घाटन मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते छ.श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून झाले.
यावेळी मंत्री गोरे म्हणाले, महाराष्ट्राचे कर्तुत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री साहेबांनी संदेश दिला आहे की,माझ्या वाढदिवसा दिवशी लोकसेवा करा, जनसेवा करा आणि याच अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरांचे आयोजन होत आहे. महाराष्ट्रात होत असलेल्या या रक्तदान शिबिराचा विश्वविक्रम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करून माण – खटाव तसेच सातारा सोलापूरच्या जनतेच्या वतीने मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यापुढे ते म्हणाले, महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये फडणवीस साहेबांचे योगदान आहेच परंतु याही पुढे महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो,अशा शुभेच्छा जनतेच्या वतीने दिल्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो संकल्प केला आहे,तो संकल्प पूर्ण व्हावा अशी परमेश्वर चरणी त्यांनी प्रार्थना केली. यापुढे मंत्री जयकुमार गोरे यांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना स्वहस्ताने रक्तदाता प्रमाणपत्र वितरित केली.
या रक्तदान शिबिरांमध्ये वडूज येथे 325 रक्तदात्यांनी रक्तदान केले,म्हसवड येथे 315 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर दहिवडी येथे 176 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
दहिवडीच्या नगराध्यक्ष सौ. नीलम अतुल जाधव रक्तदात्यांची कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या, तुमच्यामुळे कुणालातरी उद्याचा सूर्य पाहता येईल…
रक्ताचा एक थेंब… कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकतो.अनेक रुग्ण रुग्णालयात जीवनमरणाच्या सीमारेषेवर झुंज देत असतात.अपघात, शस्त्रक्रिया,कॅन्सर,थॅलेसेमिया,गरोदर महिलांचे अतिरक्तस्राव असे अनेक प्रसंग असतात,जेव्हा रक्ताशिवाय आयुष्य अशक्य होतं. अशा वेळी, तुमच्या रक्ताच्या थेंबांनी कुणाचा जीव वाचू शकतो.रक्तदान ही केवळ सेवा नाही,ती एक मानवतेची पुकार आहे.हे दान तुम्हाला गरीब करत नाही,उलट तुम्ही कोणासाठी तरी देवदूत ठरता.आपण रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आला…आपला हात पुढे केला…रक्तदान केले…आणि यामुळे कोणाचा तरी उद्याचं सूर्य पाहणं झालं.
यापुढे कार्यक्रमाची सांगता करताना नगराध्यक्षा म्हणाल्या,या शिबिरात माण तालुक्यातील सर्व गावांमधून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उस्फुर्त सहभाग दर्शवत सामाजिक बांधिलकी जोपासली याबद्दल जनतेचे अभिनंदन करून, या शिबिराचे आयोजन करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आणि डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.







