श्रावण मास समाप्ती निमित्त दहिवडीत झाली; लघुरुद्र महापूजा व भव्य महाप्रसाद भंडारा !
वृत्त दि. – शनिवार, २३ ऑगस्ट २०२५
वृत्त – दहिवडी,ता.माण,जि.सातारा
श्रावण मास महाप्रसाद भंडारा हा श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराची उपासना करून साजरा केला जातो. यास अनुसरून भक्तांमध्ये एकात्मता, समाधान आणि मंगलमयता नांदवण्याच्या उदात्त उद्देशाने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात दहिवडी शहरात, शंभू महादेव मंदिरात श्री शिवलिंगाची लघुरुद्र महापूजा व महाप्रसाद भंडाऱ्याचा कार्यक्रम शनिवार दि. 23 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला. सर्व शिवभक्तांना एकत्र आणून भक्तिभावाने तयार केलेला पवित्र प्रसाद मंदिर परिसरात ग्रामस्थांना वाटण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की,श्रावण मास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात भक्तगण उपवास करतात, पूजा-अर्चा करतात आणि आध्यात्मिक वाढ साधतात. समुद्रमंथनातून निघालेले विष प्यायल्याने जगाला वाचवल्याबद्दल भगवान शंकराचा गौरव करण्यासाठी हा महिना पाळला जातो. तसेच, नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला असल्यामुळे या महिन्याला एक वेगळे महत्त्व आहे.
परंपरेनुसार, सालाबादप्रमाणे शहरातील श्री शंभू महादेव मंदिरामध्ये श्रावण महिन्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते . चालू वर्षी श्रावण मास समाप्तीनिमित्त शनिवारी, सकाळी १० ते २ या वेळेत लघुरुद्र महापूजा व दहिभात महापूजा तसेच सत्यनारायण पूजा झाली. यावर्षी श्री शिवलिंगाची लघुरुद्र महापूजा व दहिभात महापूजा तसेच सत्यनारायण महापूजा करण्याचा सन्मान गोरख उर्फ बाळू कदम व त्यांच्या पत्नी रजनी कदम आणि सुभाष घाडगे व त्यांच्या पत्नी कल्पना घाडगे या दोन दांपत्यांना मिळाला.
दुपारी २ ते ३ या वेळेत सत्यनारायण महापूजा, दु.४ ते ६ या वेळेत गोंदवले बु. येथील हभप अशोक महाराज पोळ भजनी मंडळाची भजन सेवा आणि सायंकाळी ६ ते रात्री १० या भव्य महाप्रसाद भंडारा झाला. या महाप्रसादाचा लाभ दहिवडी व परिसरातील सर्व शिवभक्तांनी तसेच ग्रामस्थांनी घेतला. या कार्यक्रमासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी भाजपा कार्यकारणी सदस्या व श्री सिद्धनाथ बँकेच्या संचालिका सौ.सोनिया गोरे यांनी आपली विशेष उपस्थिती दर्शवली.
या महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ दहिवडी व दहिवडी परिसरातील सर्व शिवभक्तांनी आणि ग्रामस्थांनी घेतला. सौ. सोनिया गोरे यांनी दहिवडीच्या नगराध्यक्षा निलम जाधव यांच्या समवेत महाप्रसाद भंडाऱ्याचा लाभ घेत, या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या भक्तमंडळींचे अभिनंदन केले.
हा महाप्रसाद भंडारा यशस्वी करण्यासाठी माण पंचायत समितीचे माजी चेअरमन अतुल जाधव,श्री सिद्धनाथ बँकेचे संचालक विजय जाधव,संदीप जाधव,सिद्धार्थ गुंडगे,लालासाहेब ढवाण,अमृत जाधव (सर),अमोल गुंडगे,अनिल गाडे,मोहन जाधव (गुरूजी), दिलीप कोरडे,दत्तात्रय देशमाने,नितीन भोसले,पिंटू देवकर आदींनी आपले विशेष योगदान दिले.
श्री शंभू महादेव भक्त मंडळ दहिवडी यांनी लघुरुद्र महापूजा व महाप्रसाद भंडारा यशस्वी करण्यासाठी तन,मन आणि धनाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत केलेल्या सर्व शिवभक्तांचे व ग्रामस्थांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे परिसरात मोठे आध्यात्मिक व भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.





