दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील ५४ गावांत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना
७३० युवकांचा सहभाग; रात्रीची गस्त, संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासह पोलिसांना तातडीने माहिती देणार
वृत्त दि.- २९/०८/२६
वृत्त – माण,सातारा.
गावागावांतील चोरी, घरफोडी, जनावरांची चोरी, शेतमालाची चोरी तसेच इतर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील ५४ गावांमध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली. या ग्राम सुरक्षा दलात स्वेच्छेने सहभागी झालेल्या ७३० युवकांचा समावेश करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतून तसेच अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय वाढवून ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी दहिवडी पोलीस ठाणे हद्दीतील ५४ गावांमधील पोलीस पाटील यांच्या माध्यमातून इच्छुक युवकांची ग्राम सुरक्षा दलासाठी निवड केली.
या ग्राम सुरक्षा दलाचा स्थापना व मार्गदर्शन कार्यक्रम शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी दहिवडी कॉलेज, दहिवडी येथील सभागृहात पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमात ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्या हस्ते टी-शर्ट, काठी, शिट्टी आणि बॅटरी यांचे वाटप करण्यात आले. तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या श्रीपाळपण, स्वरूपखानवाडी आणि मार्डी येथील पोलीस पाटील यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे म्हणाले की, गावाची सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ती अधिक सक्षम होते. ग्राम सुरक्षा दलाच्या माध्यमातून रात्रीची गस्त, संशयित हालचालींवर लक्ष ठेवणे, तसेच कोणतीही अनुचित घटना किंवा संशयास्पद बाब निदर्शनास आल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देणे शक्य होणार आहे.
“गावातील सुरक्षा ही माझी जबाबदारी” हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असून, लोकसहभागातून उभा राहिलेला हा उपक्रम चोरी, घरफोडी, जनावरांची चोरी, शेतमालाची चोरी तसेच इतर गुन्हे रोखण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कमी कालावधीत ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करून ते कार्यान्वित केल्याबद्दल त्यांनी दहिवडी पोलिसांचे कौतुक केले. लोकसहभागातून राबविण्यात आलेला हा उपक्रम सातारा जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण, औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील जानकर, दहिवडी कॉलेजचे प्राचार्य श्री. खत्रे, दहिवडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार, विविध गावांतील पोलीस पाटील तसेच ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पा गायकवाड यांनी केले. दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले.


