क्राईम
Trending
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिसांची कारवाई; ५५ इसमांना माण तालुक्यात प्रवेशबंदी
वृत्त – दहिवडी, ता.माण,जि.सातारा.
श्री गणेशोत्सव २०२६ शांततेत व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलिसांनी हद्दीतील ५५ इसमांना माण तालुक्यात प्रवेश करण्यास मनाई आदेश लागू केला आहे.
दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारू विक्री, अवैध धंदे, गर्दी व मारामारी तसेच कायदा व सुव्यवस्था व शांतता भंगविणारे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींविरुद्ध ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस ठाण्याकडून संबंधित प्रस्ताव माणचे उपविभागीय अधिकारी माण खटाव (दहिवडी) यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार संबंधित ५५ इसमांना दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत, म्हणजेच तीन दिवस, गणेशोत्सव व गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान माण तालुका हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी शासनाने दिलेल्या नियमांचे व अटींचे उल्लंघन करू नये, शांतता राखावी आणि कोणत्याही प्रकारचे अनुचित कृत्य करू नये, यासाठी मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६८ अन्वये सुमारे १ हजार रुपयांचे नोटीस बजावण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भाऊसाहेब गोसावी व महिला पोलीस नाईक पुनम राजपूत यांनी केली आहे.
श्री गणेशोत्सव काळात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दहिवडी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
