क्राईम
“दहिवडी पोलिसांचा धडाका! गोंदियातील चोरट्यांची टोळी जेरबंद; ₹८२,५०० चा मुद्देमाल जप्त”
वृत्त दि. – १५ जून २०२६
वृत्त – माण,सातारा.
संपादक – चैतन्य नंदकुमार काशिद
माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरात; दहिवडी पोलीस स्टेशनने सपोनिदत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचा गौरव जिल्ह्यासह पंचक्रोशीत वाढवल्याचे चित्र मागील काही दिवसापासून जनतेला पाहायला मिळत आहे. अशातच दहिवडी पोलिसांनी आणखी एक उल्लेखनीय कामगिरी करत एस.एस. इलेक्ट्रिकल कंपनीच्या सुपरव्हायझर प्लांटमधून चोरी झालेल्या अल्युमिनियम तारा आणि लोखंडी पोल चोरी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावला आहे. या कारवाईत गोंदिया जिल्ह्यातील चार जणांच्या टोळीला अटक करण्यात आली असून, चोरीस गेलेला ₹८२,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील आंधळी परिसरातील शेतामध्ये सुरू असलेल्या एस.एस. इलेक्ट्रिकल कंपनीच्या कामाच्या ठिकाणाहून १,२०० मीटर अल्युमिनियम तार व दोन लोखंडी पोल अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना तपास पथकाला कंपनीच्या लाईनवर काम करणाऱ्या काही कामगारांबाबत संशय आला. त्यानुसार सखोल चौकशी केल्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील दीपक गोविंद मेश्राम, राहुल चरण अलगदेवे, दुर्गेश राधेलाल मौजे, संदीप बकाराम तुमसरे या चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
अटकेत असलेल्या आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपास दहिवडी पोलीस करीत आहेत.
👮♂️ पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक
या यशस्वी कारवाईसाठी दहिवडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व तपास पथकाने केलेल्या वेगवान आणि अचूक तपासाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. चोरीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींना जेरबंद करत पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यक्षमतेची छाप पाडली आहे.
